Tuesday, August 19, 2014

काळ्या मातीत गंध ओतणारा, धरिणीला नक्षीदार हिरवा शालू पांघरणारा हा पाऊस आहे तरी काय? त्याच्या नुसत्या आगमनाची वार्ता मनातील मोरांना, कधी एकदा भिजू? म्हणून अस्वस्थ करून सोडते. आपण मात्र, पूर्ण हिरवे होऊ दे, मग बाहेर पडू, असे स्वत:ला बजावतो व गरमा गरम भजी व वाफाळणार्‍या चहाचे सोपस्कर पूर्ण करतो... नभं उतरू आलं, म्हणत पावसाची गाणी दिवसागणिक आठवण करून देऊ लागतात, आपल्याला जायचे आहे...सब कुछ छोड छाडके, मनसोक्त डुबायचे, भिजायचे आहे...शेताच्या बांधावरून पळायचे आहे...झुळू झुळू वाहणार्‍या झर्‍यांचे स्वर कानात साठवायचे आहेत...डोंगरांचा हिरवा साज मनभरून बघायचा आहे...या हिरव्या साजातून खळखळून वाहणार्‍या पांढर्‍या शुभ्र प्रपातांना भेट द्यायची आहे...धबाबा कोसळणार्‍या जलधारांना हॅलोऽऽ म्हणायचे आहे...जमले तर त्यांना शेक हॅन्ड करायचाय... पाऊस कवितांचा तर कहर आहे, त्यातील ओळी, मनाचा दरवाजा ठोठावून सांगतात, चला! एखादा बेत ठरवा! जाऊया दोस्तांसोबत, एखादी फास्ट राईड मारू... घर, ऑफिस, शाळा, कॉलेज म्हंटले की, चार दोन दिवसातच पाऊस त्रास वाटायला लागतो. तेच, या जंजाळातून बाहेर पडायचे म्हटले की, चित्र आगदी पालटून जाते... जे हात, पावसाचे काही थेंब आले तरी खिडकीच्या काचा बंद करण्यासाठी सरसावायचे, तेच हात, कधी एकदा चिंब होऊ, म्हणून शिवशिवू लागतात... गावात चिखलातून रस्ता ओलांडतानाही केवढा त्रास, तोच चिखल शेतशिवारात, रानावनात तुडवायला मिळणार म्हणून मनाची अधिरता वाढवतो... झाले तर मग! आता लवकर एखादे ठिकाण सूचवा! फार नाही थांबू शकत...विक एन्ड पर्यंत सुद्धा थांबायचे नाही...आत्ताच बाहेर पडायचेय...कालचा पाऊस किती छान झाला...पत्र्यांवरची टप टप ऐकून जाग आली...आकाशाने तर शॉवर सारख्या तेज धारा धरलेल्या..वीजेच्या दिव्यावरच्या धारा किती तरी वेळ बघत होतो...थोड्याच वेळात पडदा सरकला...आवाज बदलले...नवा पडदा सुरू झाला...मी आठवणींच्या महोत्सवात पहिल्या रांगेत सामिल झालो... एक डोंगर...एक ठिकाण...तिथे केलेली मस्ती...मेलेलं खेकड घेऊन बेअर ग्रिल्स सारखा काढलेला फोटो, तो एफबीवर अपलोड केला, कोणीतरी आईला दाखवला, तेव्हा आई केवढी भडकली होती... पडदा दुसरा...हाफ डे बुट्टी मारून गावाबाहेरच्या डोंगराकडे धुम मारण्याचा बेत...दोस्त कंपनी मात्र कमालीची सुस्त...त्यांना गोळा करता करता...मीच चिंब भिजून गारठून गेलो...तुच बोलावतोस आणि भिजला म्हणून माघार घेतो...राजे...आता माघार नाही...चहा मारू आणि जाऊ डोंगरावर...म्हणत त्यांचा हटवादी आग्रह...हा आग्रह धरताना मित्राने कसा मोबाईल भिजवला...पासूनचे एक एक किस्से... एका पाठोपाठ एक आठवणींचे लघुपट टाळ्या घेत होते...शेवटी पावसाचा जोर कमी झाला...घरात कोणी तरी उठल्याचा आवाज आला आणि आमची गाडी पुन्हा रूळावर...आपण घरात...बेडवर आहेत...या कल्पनेने मग, आपण घरात काय करतोय...कधी जायचे...बोला लवकर...ठिकाण सांगा...मनाने...आतल्या मनाला बजावले...तोच माझ्या फोनमधला मॅसेज अलर्ट वाजला...उघडून बघितला, तर डॉ. हेमंत बोरसेंचा लघु संदेश... रविवार दिनांक १३ जुलै...रवळ्या-जवळ्या किल्ल्यांवर यंदाचा पहिला पावसाळी ट्रेक...हेमंतचे आयोजन लाजवाब असते...ट्रेकसोल्स गटाचा तो सशक्त असा नेता...त्यांच्या नेतृत्वाखालीच ट्रेकसोल्सचे ट्रेक होतात... लागोलाग हेमंतने व्हॉटस्ऍपवर कोण कोण येणार याची विचारणा करून अंतिम यादी तयार केली...हेमंत बोरसे, डॉ. सुशिल आहिरे, डॉ. अजय जाधव, हिमांशू देशमूख, किशोर थेटे, मुळची नाशिककर, पण सद्या पुण्यात स्थायिक असलेली योगिनी नेरकर ही आपल्या चिरंजीव व श्रीमानजींसमवेत प्रथमच सहभाग झाली. प्रशांत जाधवने यंदाही लहानग्या मोनिशला सोबत घेतले...सांदण दरीत मोनिश खुप छान चालला होता...प्रशांतने मुलाला घेण्याची मोठी जोखिम उचलल्याचे जाणवले...सोमनाथ कोठूळे वगैरे मोठा चमु तयार झाला... पहाटे ५-००ला प्रस्थान करण्याचा कॉल, होता, त्याबरहुकूम मी ४-००चा अलार्म लाऊन जागा झालो...सौभाग्यवती नसल्याने आदल्या दिवशी आईकडून डबा बनवून घेतला होता...तो फ्रीजमध्ये ठेवला होता...आईने सोबत पोळ्या, भेळ व राजगिर्‍याचे लाडू दिले होते...न्याहारीसाठी धीरडे व लोणचे होते... नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे ५-००ला निघणे काही झाले नाही...सर्वजण म्हणत होते...कावरा बावरा, अर्थात किशोर विलंब करणार...पण प्रत्यक्षात विलंबाचे कारण काही स्पष्ट होऊ शकले नाही... भक्तीधाम समोर सगळे जण एकत्र आले...माझे घर जवळच असल्याने मी व सोमनाथ पायी दोन मिनीटात तिथे पोहचलो...त्याठिकाणी काही मंडळींनी टपरीवरचा चहा घेतला व आम्ही त्वरीत पेठरस्त्यावरून दिंडोरी रस्त्यावर आलो... मेरीच्या गेट समोर पुन्हा गाड्या थांबल्या...हिमश्याची लोकप्रिय इनोव्हा आमच्यात सामिल झाली होती...ट्रेकसोल्स समोरा समोर आले आणि खेचा खेची झाली नाही असे कधीच होत नाही...मेरीच्या गेटवरही, या खेचाखेचीत काही मिनीटे गेली...तितक्यात सगळ्यांना आठवण झाली....की ५-००ला निघायचो होते आणि वाजले ६-३०...तेव्हा तिन्ही गाड्यांनी वणीचा रस्ता पकडला... प्रथम पोटपुजा व्हायला पाहिजे या इराध्याने गड्यांनी एक हॉटेल हुडकून काढले...ढाबा आणि टपरी यातला सुवर्णमध्य असलेल्या या हॉटेलात मिसळ, ऑमलेट वगैरे पदार्थ ताजे मिळत होते...मंडळींनी हॉटेलातले सर्व ब्रेडस्‌ संपेपर्यंत ताव मारला...८-००च्या सुमारास आम्ही बाबापूरचा रस्ता पकडला...वणी गाव संपल्यापासूनच जोरदार पावसाचे संकेत मिळत होते...बाबापूरच्या पलिकडे आल्यावर मार्कंडेय निम्म्याहून अधिक ढगांनी झाकोळला होता...चांगल्या पावसाचे हे शूभसंकेत मानून आम्ही वेळ न दवडता बाबापूरच्या खिंडीत पोहोचलो... बाबापूरच्या आयकॉनिक खिंडीत एक ग्रूप फोटो घेतला आणि थोड्याच वेळात आमचा ट्रेक सुरू झाला...पावसाने आल्या आल्या सलामी दिली...बाबापूरच्या खिंडीची पश्चिम बाजू म्हणजे मार्कंडेयचा डोंगर, तर पूर्व बाजु ही रवळ्या व जवळ्या या जोड दुर्गांच्या पठारावर घेऊन जाते... याठिकाणहून मार्कंडेयवर पर्यटन विकासाच्या नावाखाली सुरू असलेली बांधकामे दृष्टीस पडली...लोखंडी पाईपच्या रेलिंगची नागमोडी वाट...तर वरच्या बाजुली सिमेंटची काही पक्कीबांधकामे दृष्टीस पडतात..खिंडीतच एका बाबाची भली थोरली राहूटी आहे...त्याच्यापलिकडे अनेक दुचाकी पार्क केलेल्या दिसल्या...डोंगर धारेच्या वर पासून तर मध्यापर्यंत शुभ्र दुधी धारेचा आभास करणारी छानश्या धबधब्याची लंबी चौडी धार मनाला सुखावत होती... डोंगरातल्या रस्त्यावर पकड घेण्याच्या बाबतीत बदनाम असलेल्या वूडलॅन्डस्‌ नामक पादत्राणांनी पहिल्या काही मिटर्सवरच मला, 'हा ट्रेक फार जपुन चालावा लागेल' याचे संकेत दिले...वरच्या टप्प्यावर आम्ही पंधरा मिनीटात पोहोचलो...त्याठिकाणी उजव्या बाजुने जाण्याचा प्रयत्न करून बघितला, पण वाट बर्‍यापैकी निसरडी असल्याने नेहमीच्या डाव्या बाजूचा पर्याय सोपवा वाटला व आम्ही डावीकडून वळसा घेऊन एका छोट्या खड्या चढणीला लागलो...ही चढण करत असताना पूर्वेला काही सेकंदासाठी काळ्या ढगा आडऊन सूर्य डोकावून गेला... पठाराच्या वरच्या भागात आल्याबरोबर आपल्याला रवळ्याचे दर्शन घडत असते...पण आज असे झाले नाही...ढगाच्या दाट अच्छादनातून आमचा स्वर्गसुखाचा प्रवास सुरू होतो...बेधुंद करणार्‍या या वातावरणात सवंगड्यांसोबत सर्व जण हरखून गेले होते... पंधरा फुटाच्या पलिकडचे काहीही दिसत नव्हते...त्यामुळे व्हायचे तेच झाले...आम्ही रस्ता चुकलो...रवळ्याला डावीकडे ठेऊन दोन किल्ल्यांच्या मधोमध असलेल्या तिवारी वस्तीत आम्हाला जायचे होते...अखेर पंधरा वीस मिनीटे वाट बघुनही वाट मिळेना...तेव्हा काहींनी गुगल मॅपवर मार्ग शोधण्याचा प्रयत्न केला....त्यामुळे दिशा स्पष्ट झाली...पण वाट स्पष्ट होत नव्हती... अखेर थोड्या वेळात ढगांची चादर बाजुला झाली आणि समोर भला मोठा पहाड दिसू लागला...वरच्या बाजुने निम्मा अधिक ढगांनी वेढलेला...हाच रवळ्या... रवळ्याकडे जाताने आम्हीला रानकेळीची अनेक झाडे दिसली...अवघ्या पंधरा मिनीटात आम्ही तिवारी वस्तीत पोहोचलो...प्रत्येकाच्या पायांना किलो किलोभर चिखल लटकलेला होता....काही जण तो सारखा काढण्याचा प्रयत्न करत होते...तिवारी वस्ती म्हणजे गडावरच्या जुन्या वसाहतीचे भग्नावशेष... याठिकाणी अजूनही तिवारी व परदेशी नावांची मंडळी आपल्या गाई व म्हशी चरण्यासाठी सोडून देतात...रोज दोन्ही वेळ वस्तीवर येऊन दुध काढले जाते...गडावरच्याच गवत, गोवर्‍यांवर हे दुध आटवून त्याचा खवा तयार केला जातो...हा खवा कळवणच्या बाजारात चांगल्या भावात विकला जातो...पाच वर्षांपूर्वी मी ७०/- रूपये किलो दराने एक किलो खवा घरी नेला होता...हल्ली दिडशेच्या आसपास भाव असावा...वस्ती निर्मनूष्य असल्याने भाव समजु शकला नाही... तिवारी वस्ती लगत दगडातच पाण्याची काही टाकी आहेत...पाणी गढूळ होते...त्यामुळे थोडी पोटपुजा करताना, आम्ही सोबत आणलेले पाणी पिणे पसंद केले... रवळ्याचा शेवटचा टप्पा अवघड असल्याने आम्ही जवळ्याच्या दिशेने कुच केली...वीसेक मिनीटात आपण खालून दिसणार्‍या गुहांच्या समुहापर्यंत पोहचतो...ट्रॅव्हर्स छोटा असला तरी थोडा घसारा आहे...त्यामुळे जपुन चालावे...गुहांचे काम अपूर्ण राहिले आहे...जेमतेम एक माणूस उभा राहू शकेल इतकीच जागा त्यात आहे...समोरचा भाग मात्र दगडात व्यवस्थित कोरण्यात आला आहे...या गुहेतून हिरवे कंच पठार, तिवारी वस्ती व ढगांचा मुकुट धारण केलेला रवळ्या असा एकुण नजारा मनाला कमालीचा सुखावत होता... ट्रॅव्हर्स ओलांडून आपण पूर्व बाजुकडे येतो...याठिकाणी अवघ्या २५ फुटांचा रॉकपॅच आहे...हात व पायांना पकड घेण्यासाठी नैसर्गिक, पण पर्याप्त खाचा जरूर आहेत...पण पावसामुळे निसरड्या बनलेल्या दगडावर पकड ठेवताना संयमाचा चांगलाच कस लागला... पॅच ओलांडून आम्ही वरच्या बाजुला आलो तोच पायर्‍यांच्या पुढे आम्हाला एका वेळेस एक जण जाऊ शकेल इतक्या रूंदीचा बोगदा दिसला...पेठच्या कोथळीगडाची आठवण करून देणारा...अर्थात कोथळीगडाचे बांधकाम वैशिष्ट्यपूर्ण आहे...तरीपण दगडातून खोदून काढलेला चिंचोळा मार्ग पाहून आम्ही आनंदाच्या भरात यू्ऽऽहूऽऽ अशी आरोळी ठोकली... वरच्या बाजुला जाण्यासाठी पूर्वी या ठिकाणी दरवाजा असावा...बाहेरच्या भिंतीवर फारसी भाषेतला शिलालेख कोरला आहे...जो धोडपच्या शिलालेखाची आठवण करून देतो...त्यातल्या पायर्‍यांवर चिखल व माती असल्याने बरीच सावधगिरी बाळगत आम्ही वर आलो...वर एक छोटा बुरूज थोडा चांगल्या स्थितीत आढळला... याठिकाणी आम्हीला जो वेगवान वारा व पाऊस लागला तो कायमचा स्मरणात राहील...अगदी अॅक्यूप्रेशर सारखा पावसाचा मारा झेलत आम्ही माथ्याच्या दक्षिण बाजुला जाऊ लागलो, तोच शिगोशिग भरलेली कातळ कोरीव पाण्याची टाकी लागली....आणि आभची भर पावसात शिखरावर जाण्याची कसरत अगदी सफल झाली... पावसाचा मार संपल्यानंतर पुन्हा ढगांनी माथ्यावर दाटी केली...त्यांची सोबत काय चीज असते...हे प्रत्यक्ष अनूभवून बघावे...माथ्यावर काही ठिकाणी वस्तीचे अवशेष आढळतात...याठिकाणी मुक्काम करण्याजोकी जागा नाही...कातळकोरिव टाक्यात स्वच्छ पाणी आहे...उन्हाळ्यातही पुरेल इतका पर्याप्त साठा आहे... ढगांची साथसंगत सोडवे ना, पण आमचे काही सवंगडी खालच्या टप्प्यावर होतो...शिवाय रावळ्याही करायचा होता...त्यामुळे आम्ही इतके सुंदर वातावरण असतानाही गड माथा सोडला...अधुन मधुन अगदी थोड्या वेळासाठी...फक्त काही सेकंदाकरिता सूर्य ढगाआडून डोकावत होता...आसमंत काळ्या ढगांनी व्यापलेला असल्याने निकटच्या डोंगररांगा नीट दिसत नव्हत्या...रामजी पांगेराच्या स्मृतींचा गंध पसरवणारा कणेरगड मात्र सर्ववेळ आम्हाला खुणावत होता...थोड्या वेळाने धोडपवरचे ढग बाजुला झाल्याने त्यानेही दर्शन दिले... ट्रॅव्हर्स खुपच निसरडा असल्याने आम्ही पूर्व टोकाचे खुरटे जंगल उतरून पठारावर आलो...समोर या पठाराला बिलगुन उभा असलेला गोरसर डोंगर लक्ष वेधून घेत होता...त्यावर काही पाण्याची तळी असल्याचे जवळ्याच्या वरून उतरदाना दिसत होते... तिथून अवघ्या वीस मिनीटात आम्ही परत त्रिवारी वस्तीत आलो...वेळ न दवडता आम्ही लागोलाग रावळ्याच्या दिशेनेकुच केली...पुन्हा जोरदार पावसाचा मारा...पण हा पावसाळी ट्रेक असल्याने खुप आनंद वाटला... आमच्यातला एक गडी पाय दमडल्याने जायबंदी झाला होता, तर काहींना थकवा जाणवत होता, त्यामुळे निम्मा चमु रावळ्यावर गेला...निसरड्या वाटातून माग काढत आम्ही शेवटच्या दगडाच्या टप्प्यावर पोहोचलो...उजव्या बाजुने वर जाण्याचा मार्ग बंद झालेला आढळला...याठिकाणी एक २.५ बाय २.५ फुटाची चौकीनी कातळकोरिव गुहा दिसला...दहा फुटानंतर तिचा मार्ग बंद होता...काम अर्धवट राहिल्याची ही खुण... डावी वाटबंद असल्याने आम्ही परतण्याचा निर्णय घेतला...पण हेमंत हार मनायला तयार नव्हता...नखशिखांत भिजलेल्या स्थितीत त्याने चिंचोळ्या जागेतून वर जाण्याचा निर्णय घेतला...एका लहान झर्‍याची ती वाट होती...तो पार करून आम्ही एका विस्तीर्ण अशा दगडी टप्प्यावर आलो...तिथे वीस फुटांचा दगडी पॅच आमची वाट आडवून उभा होता...वर तटबंती व बुरजाचे ढासळलेले अवशेष दिसत होते...कोणी तरी बोल्ट मारून त्याला दहा फुटाचा दोर अडकवला होता... निसरड्या दगडावर आमच्या तील काहींनी सुमारे पंधरा एक मिनीटे दोर पकडून वर जाण्याचा प्रयत्न केला...पण सुरक्षितता वाटत नव्हती...शिवाय वेळेत परतायचे असल्याने आम्ही नाद सोडला व या पॅचवरच पोटपुजा करण्याचा निर्णय घेतला...गडावरचे भग्न प्रवेशद्वार, गणेशाची मुर्ती, कातळकोरिव पायर्‍या व पाण्याची टाकी...हे सर्व बघायचे राहूनच गेले... या पॅचवरून सभोतालचा विस्तीर्ण परिसरावर नजर टाकता येते....रावळ्या जावळच्याचे संपूर्ण पठार एका टप्प्यात दृष्टीस पडते...इथून कणेरगड, धोडप पुर्णपणे दिसत होते...अधून मधून ढग, तर मधूनच पाऊस अशा वातावरणाचा आम्ही मनमुराद आनंद लूटला... खालच्या सवंगड्यांना परतण्याचा संदेश देऊन आम्हीही पॅच सोडला...तोच दोन गुराखी झर्‍याच्या मार्गाने दुडूदूडू धावत वर आलो...आपल्या बकर्‍या शोधण्यासाठी ते रावळच्याच्या माध्यावर चाललो होते...ज्या दोरावरून कसे जायचे हे समजत नव्हते...तो दोर त्यांनी, घड्याळाच्या लोलकासारखा झोका घेऊन वरच्या टप्प्यावर जाण्याचा कसब आम्हाला दाखवून दिले...आम्हाला किल्ली सापडली होती...पण आमचे सवंगडी त्याअगोदरच पुढे निघाल्याने आम्ही माथा नंतर केव्हा तरी, अशी मनाची समजूत घालून माघारी परतलो... आमचा हा निर्णय खुपच योग्य होता...कारण नंतर मुसळधार पाऊस लागला...असा पाऊस की, वर्षोनूवर्षे मनाच्या तिजोरीत दागिन्यासारखा आठवणीत रहावा...हिरवाईने नटलेले पठार, दरीतून वर येणारे तलम ढगांचे पुंजके...जणू कोणीतरी रेशमाचे धागे पिंजून...वर लयदार पद्धतीने सोडत आहे...अचानक सोसाट्याचा वारा हे पुंजके दूर सारतो...नी सोबतीला घेऊन येतो आपला सखा...पाऊस...पाऊसही असा...की धोऽऽधोऽऽ कोसळणारा...वेगवान वारे व पावसाची संगत म्हटल्यावर सारी सृष्टी या दोन सवंगड्यांची मस्ती डोळे भरून बघत राहते...त्यांची मस्ती काही साधी सुधी नाही...त्यात असते प्रचंड ताकद...त्या ताकदीपुढे आम्हा पामरांचे काय चालणार...तेव्हा आम्ही सुद्धा जागीच खिळून त्याचा स्पर्ष झेलत...सुखावत होतो... निसरड्या खडकावरच्या वाटांशी झुंजत आम्ही एकदाचे परतलो...दुपारी ५-००च्या आत बाबापुरच्या खिंडीत परतण्याचा आमचा निर्धारही सफल ठरला... या पावसाळ्यातला हा आमचा पहिला वहिला ट्रेक...तसे आम्हाला कोणत्याही ऋतूचे बंधन नसते, डोंगर-दर्‍यात भटकण्यासाठी...पण पावसाची बात न्यारी आहे...भर उन्हाळ्यात आम्ही असंख्य ट्रेक्स यापूर्वी केले असतील...पण गडावर जाणे असो की, तिथून येणे, उन्हात चालणे खुप जिकीरीचे होऊन जाते... पावसाळ्यात मी धबधबे करण्यावर जास्त भर देतो...शिवाय, 'तो वार्षिक सोहळा' असतोच, ब्रम्हगिरी प्रदक्षिणेचा...अनवाणी ६० किलो मिटर्स चालण्याचा...पण यंदा बर्‍याच वर्षांनी भरपावसात किल्ल्यावर गेलो...एक नव्हे दोन किल्ले केले...रवळ्या व जवळ्याला भेट देण्याचे भाग्य लाभले... ---